करवीरकर छत्रपतिंनी अंबाबाईचं स्थान अबाधित ठेवून आपली कुलदैवता तुळजाभवानीची स्वतंत्रपणे जून्या राजवाड्यात स्थापना केली. या राजवाड्यात सुंदर असा लाकडी मंडप असून त्याच्यावरील नक्षीकाम सुबक व छान आहे. इटलीतील सुंदर झुंबरसुध्दा येथे पहायला मिळतात, तसेच कासवाच्या पाठीवरील छोटे मंदिर आहे. कोल्हापूरकर छत्रपतिंची गादी तसेच छ. शाहूंचा लाकडी भव्य पुतळा व त्यांनी केलेल्या शिकारी येथे पहायला मिळतात.
*कसं जायचं - को.श. मुख्य बसस्थानक - भवानी मंडप - जुना राजवाडा (४ किमी)ऐतिहासिक पर्यटन
भारतात ऐतिहासिक पर्यटनाची क्रेझ असलेली दिसून येते. पर्यटक मोठ्या प्रमाणात अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन तिथला इतिहास जाणून घेताना दिसत आहेत. कोल्हापूरात सुध्दा नवा राजवाडा, भवानी मंडप परिसर, साठमारी व ऐतिहासिक समाधी स्थळे इत्यादी विविध स्थळांमधून ऐतिहासिक पर्यटनाचा अनुभव घेता येतो. ही ऐतिहासिक ठिकाणे पाहताना आपण नक्कीच इतिहासात रमून जाल.शहरांतर्गत ऐतिहासिक स्थळे...
उत्कृष्ट स्थापत्य शैलीचा भवानी मंडप परिसर
कोल्हापूरातील उत्कृष्ट स्थापत्यशैलीच्या नमून्यापैकी एक म्हणजे भवानी मंडप परिसर होय. इथे जी भव्य कमान दिसते ती नगारखान्याची इमारत आहे. याची निर्मिती कोल्हापूरकर छत्रपतींच्या काळात झाली. हे भव्य असे प्रवेशव्दार इतिहासाची साक्ष देते. पाहता क्षणीच याच्या कोणीही प्रेमात पडेल इतके सुंदर आहे हे. याच्यावर कोरलेल्या कलाकृतीही अतिशय बारीक व सुबक आहेत. वेगवेगळे नक्षीकाम याच्यावर केलेले असल्याने हे भव्य प्रवेशव्दार खूपच ग्रेट दिसते.
*कसं जायचे - मुख्य बसस्थानक - शिवाजी चौक - भवानी मंडप ४ किमीएैतिहासिक मेन राजाराम कॉलेज
मेन राजाराम कॉलेजची इमारत ही स्थापत्य कलेचा उत्तम नमूना ठरतो. भवानी मंडपाला लागूनच याची इमारत आहे. या आकर्षक इमारतीत केल्या गेलेल्या अनेक कोरीव कामांनी याची शोभा वाढवली आहे. या इमारतीची रचनाच मुळात शैक्षणिक कार्यासाठी केली गेलेली आहे. या ऐतिहासिक कॉलेजला डॉ. बाबासाहेबर आंबेडकरांनी सुध्दा आवर्जून भेट दिली होती. आजही इथे कॉलेज असल्याने आपणास ही इमारत बाहेरील बाजूने पाहता येते.
कसं जायचं - बस स्थानक - भवानी मंडप - राजाराम कॉलेज ४ किमी.दुर्मिळ ग्रंथ संपदा असलेले करवीर नगर वाचन मंदिर
ऐतिहासिक राजाराम कॉलेजच्या समोरच ही १०० वर्षापूर्वीची वाचनालयाची इमारत असून साहित्यीकांची दिर्घ परंपरा लाभलेले हे ठिकाण आहे. वास्तू शिल्पांचा हा सुंदर नमुना असून याच्यावरील नक्षीकाम सुबक वाटते. येथे दुर्मिळ ग्रंथ संपदा उपलब्ध आहे.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - भवानी मंडप - करवीर नगर वाचन मंदिर (४ किमी.)बिंदू चौक तटबंदी
कोल्हापूर हा भुईकोट किल्ला होता. पूर्वीचा कोल्हापूरचा विस्तार बिंदु चौक, मिरजकर तिकटी, गांधी मैदान, अर्धा शिवाजी पुतळा, रंकाळा स्टँड, गंगावेश, शिवाजी पुतळा व पुन्हा बिंदु चौक इतका होता. ४२ बुरुज व वेशींचा हा परिसर होता. पूर्वीच्या काळी बुरुज व खंदक मुजवण्यात आले. काही महत्वपूर्ण भागापैकी बिंदू चौकात थोडी तटबंदी व प्रवेशव्दार राखून ठेवण्यात आले आहे. मंगळवार वेस, शनिवार वेस, गंगावेस, रविवार वेस, वरुणतीर्थ वेस व रंकाळा वेस असा हा वेशींचा परिसर होता. आज शहरातील एैतिहासिक पार्श्वभूमीचा तो मानदंड ठरतो.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - बिंदू चौक (४ किमी)राजर्षि छ. शाहू खासबाग कुस्ती मैदान
छ. शाहू महाराजांनी रोम देशाच्या भेटीमध्ये तिथले ऑलंपिक मैदान पाहिलं अगदी तसेच कुस्ती मैदान कोल्हापूरात असावं या हेतूने खासबाग कुस्ती मैदानाची निर्मिती १९१२ ते १९१८ या सहा वर्षाच्या परिश्रमाने केली. इथे २० ते २५ हजार लोकांना विना अडथळा कुस्ती पाहता येऊ शकते इतकं हे उत्कृष्ट बनवलं आहे. ही शाहू महाराजांची दूरदृष्टीच होती. तत्कालीन देशातील सर्वोत्कृष्ठ कुस्ती मैदान म्हणून प्रसिध्द होते. याला लागूनच असलेल्या कलायोगी जी. कांबळे चित्र संग्रहालय व केशवराव नाट्यगृह आपण पाहू शकतो.
कसं जायचं - मध्यवर्ती बस स्थानक - खासबाग मैदान (४ किमी)प्रतिभाशाली केशवराव भोसले नाट्यगृह पॅलेस थिएटर
छ. शाहू महाराज आपल्या परदेश दौ-यात असताना आधुनिक थिएटर पाहिले होते तसेच एखादे आपल्या संस्थानात असावे असे महाराजांना वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी सुप्रसिध्द पॅलेस थिएटरची निर्मिती केली. त्यालाच पूढे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या थिएटरमध्ये अनेक प्रतिभाशाली कलाकरांनी आपल्या कलेचे योगदान दिले आहे. या थिएटरची अंतर्गत रचना इतकी जबरदस्त होती की विना साऊंड सिस्टीम सर्वात मागे बसलेल्या व्यक्तीलासुध्दा सहज सगळे संवाद ऐकू येत असत. ही छ. शाहू महाराजांची दूरदृष्टी होती.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - बिंदू चौक - केशवराव नाट्यगृह (४ किमी)चित्त थरारक साठमारी
हे रोमांचकारी खेळ छ. शाहू महाराजांनी बडोद्यावरुन कोल्हापूरात आणला होता. या खेळात हत्तीला चिथवून तो हाती अंगावर आला की, एका बुरुजामध्ये लपून बसत त्यास बुरुजास आगड म्हणतात. त्यामधून बाहेर पडून हत्तीला परत डिवचत. यातून थोडी जरी चूक झाली तर हत्तीच्या पायदळी तुडवण्या जाण्याची शक्यता फार असे. आजही आपण या धाडसी खेळाचे आगड कोल्हापूरातील छ. शाहू मैदान येथे पाहू शकतो.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - शाहू मैदान – साठमारी (३ किमी)नवा राजवाडा - मराठा राजेशाहीचे प्रतीक
छ. शाहू महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेली ही वास्तू अतिशय देखणी अशी आहे. शहराच्या उत्तरेस रम्य वणश्रींच्या सानिध्यात कित्येक एकराच्या विस्तृत परिसरात हा भव्य असा दुमजली राजवाडा उभा आहे. इ.स. १८७७ ते १८८४ या कालावधीत अहिल्याबाई राणी साहेबांनी बांधून घेतली. अष्टकोनी मनोरा व हिंदू शिल्प शैलीचे उत्कृष्ट मिश्रण इथे पहायला मिळते. नवा राजवाड्याच्या आवारात एक छोटे तळे असून या तळ्याजवळ निरनिराळे पक्षी, हरण, सांभार इ. प्राणी पहायला मिळतात.
*कसं जायचं- मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - दसरा चौक- महावीर कॉलेज - नवा राजवाडा (३ किमी)ऐतिहासिक टाऊन हॉल
कोल्हापूर शहरातील गोथिक शैलीत बांधलेली ही सुंदर वास्तू आहे. ही इमारत १८७२ ते १८७६ या कालखंडात बांधली गेली. त्या काळी ती संस्थानची कार्यालयीन इमारत होती. याच्या सभोवती सुंदर बगीचा दुर्मीळ वृक्ष पहायला मिळतात. इथून जवळ असलेल्या छ.प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालय छ. शिवराय व छ. ताराराणी यांचे मंदिर त्याच बरोबर नव्याने होत असलेल्या छ. शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊ शकता.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - दसरा चौक - टाऊन हॉल (२.५ किमी)थोरला दवाखाना - छत्रपति प्रमिलाराजे रुग्णालय (सी.पी.आर)
हा दवाखाना म्हणजे प्रथमदर्शनी एखादा राजवाडाच वाटतो. पण मुळात याची निर्मितीच दवाखान्यासाठी झाली होती. कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांच्या काळात झाली. याचे पूर्वीचे नाव अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल असे होते. आजही हा दवाखाना अनेकांना सेवा बजावत आहे. या इमारतीवरील नक्षीकाम देखणे व लक्षवेधक आहे. याचे बांधकाम गॉथिक शैलीत चार्ल्स माँट यांनी केलेले आहे. हौसी पर्यटक येथे भेट देवून अधिक माहिती घेऊ शकतात.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - दसरा चौक – सीपीआर (२.५ किमी)छ. शिवराय व छ. ताराराणी मंदिर व प्रिन्स शिवाजी मंदिर
छ. शाहू महाराजांनी या मंदिरांची निर्मिती केली. दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला सध्याचे छत्रपती कुटुंब छ. शिवरायांच्या मंदिरात येवून पुजा करतात. या मंदिराच्या मागे राजघराण्यातील सात लोकांची स्मारके आहेत. इथे जे दुमजली मंदिर दिसते ते छ. शिवरायांचे आहे. त्याच्या बाजूला जे मंदिर आहे ते महाराणी ताराराणींचे आहे व ताराराणींच्या मंदिरासमोर जे मंदिर दिसते ते छ. शाहू महाराजांचे थोरले पुत्र प्रिन्स शिवाजी यांचे आहे. छ. शाहूनी निर्मिती केलेली ही मंदिरे पाहण्यासारखी आहेत.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - दसरा चौक- (२.८ किमी)छ. शाहू महाराज समाधी स्थान
राजर्षि शाहू महाराजांनी आपल्या हयातीत सन १९१६ मध्ये लिहून ठेवले त्याप्रमाणे नर्सरी बागेमध्ये सध्या या समाधी स्थळाचे काम चालू आहे. येत्या काही दिवसांमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - दसरा चौक- (२.८ किमीkm)प्राचिन संस्कृती - ब्रह्मपूरी
इ.स. पूर्वी दुस-या शतकातील हे प्राचिन गाव जमिनीखाली गाडले गेले होते. डेक्कन कॉलेज पूणे यांनी उत्खनन करुन संशोधनाचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये आढळलेले अवशेष वस्तू टाऊन हॉल संग्रहालयात ठेवले असून उत्खननाचे ठिकाण मात्र पाहता येत नाही. आज या जागेवर झोपडपट्टीचे अतिक्रमण असून ते काढून उत्खननाचे क्षेत्र पर्यटकांना पाहण्यास खूले करता येईल. मोहनदजोदडो व हडाप्पा संस्कृतीच्या नंतर भारतातील गाडल्या गेलेल्या शहराचा हा एकमेव परिसर आहे.
*कसं जायचं- मुख्य मध्यवर्ती बस स्थानक -दसरा चौक -तोरस्कर चौक- ब्रह्मपूरी (४किमी)छत्रपतीचे समाधी स्थळ व करवीर मठ, पंचगंगा घाट
येथील नदी पात्र पाहून तेथून त्याला लागूनच एक तटबंदी दिसते त्यालाच एक छोटा लोखंडी दरवाजा दिसतो. खरतर बाहेरुनच आपल्याला तटबंदीच्या आतील मंदिराची शिखरे दिसतात. त्यामधील जे मोठे शिखर दिसते ते म्हणजे शिवमंदिर होय. तटबंदीच्या छोट्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपणांस अनेक समाध्या दिसतात. इथे छ. ताराराणी व इतर महत्वाच्या समाध्या आहेत. तसेच करवीरकर छ. संभाजी महाराजांची समाधी सुध्दा इथे दिसते, ती शिवमंदिराला लागून आहे. इथले वैशिष्ट्ये म्हणजे शिवमंदिर. हे मंदिर स्थापत्य शास्त्रातील कोल्हापूरातील एक अजोड नमूना आहे. उत्कृष्ट आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी जोतीबावरील दगड वापरला आहे. या दगडांना घासून इतका गुळगुळीत केला आहे की या दगडांमध्ये आपला चेहरा दिसतो. मंदिरामध्ये शिवलिंग असून ते सुध्दा उत्कृष्ट आहे तसेच येथील गाभा-याची चौकट पाहण्याजोगी आहे.
*कसं जायचं - मुख्य मध्यवर्ती बस स्थानक - शाहू मैदान – साठमारी (३ किमी)अजोड ऐतिहासिक कलाकृती, धुण्याची चावी
छ. शाहू महाराजांना आपल्या जबरदस्त दूर दृष्टीतून धुण्याच्या चावीची निर्मिती केली. रंकाळा तलावात धुणे धूवून तलाव दुषित होऊ नये म्हणून छ. शाहूंनी तलावापासून थोडं लांब अंतरावर रंकाळ्याचे पाणी सायफन पध्दतीने आणून कपडे धुण्याची कायम स्वरुपी सोय केली. इथे किमान ३० हून अधिक दगडी भांडे आहे. त्यामध्ये पूर्वी कपडे धुत असत. छ. शाहूंच्या दूरदृष्टीतून तयार झालेली ही निर्मिती कोल्हापूरचे हेरिटेज आहे. ही धुण्याची चावी सर्वांनी जरुर न चुकता पहावी अशीच आहे.
*कसं जायचं- मुख्य मध्यवर्ती बस स्थानक -दसरा चौक -पंचगंगा घाट ४किमीनेकलेस ऑफ कोल्हापूर, रंकाळा तलाव
कोल्हापूरातील पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलाव महत्वाचे आहे. आजच्या रंकाळ्याच्या जागी एक भली मोठी खण होती. याच खणीतील दगडांचा वापर तत्कालीन शहरातील मंदिरासाठी केला गेला. रंकाळा तलावाशेजारील रंकभैरव मंदिर, चौपाटी, टॉवर, संध्यामठ, नंदी मंदिर, शालीनी पॅलेस इ. वास्तू शिल्पे, वारसा स्थळे पहायला मिळतात. रंकाळा तलावात देशी विदेशी स्थलांतरीत पक्षी पहायला मिळतात. तसेच मन मोहून टाकणारा सुर्यास्त नक्की पहावा.
कसं जायचं- मुख्य मध्यवर्ती बस स्थानक-शिवाजी चौक-रंकाळा स्टँड- रंकाळा तलाव (५किमी)राजेशाही शालिनी पॅलेस
कोल्हापूरातील ही आणखीन एक वास्तू ज्याचे सौंदर्याने सर्वांना भुरळ पाडली आहे. रंकाळा तलाव चौपाटीवर गेल्यावर एक भव्य राजवाडा आपले लक्ष अक्षरशः खेचून घेतो तो राजवाडा म्हणजे शालिनी पॅलेस होय. छ. राजाराम महाराज यांनी रंकाळा तलावाच्या पश्चिम काटावर १९३१ ते १९३४ या कालखंडात हा भव्य राजवाडा बांधला आहे. वास्तू शिल्पांचा अप्रतिम नमूना म्हणून याकडे पाहिले जाते. या राजवाड्यामुळे रंकाळ्याला व रंकाळ्याला या राजवाड्यामुळे एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झालेले आहे.
*कसं जायचं- मुख्य बसस्थानक - बिंदु चौक - छ. शिवाजी चौक - गंगावेश - रंकाळा तलाव - शालिनी पॅलेस (५किमी)देशातील एक आदर्श पाणी योजना - पाण्याचा खजिना
कोल्हापूर शहरात साधारणतः १७६० ते १७७० या काळात २१ तळी होती. पाणी मुबलक होते पण तळ्यांची स्वच्छता नव्हती. सांडपाणी तळ्यातच मिसळायचं. त्यामुळे रंकाळा, पद्माळा वगळता इतर तळ्यांचं पाणी पिण्यायोग्य नव्हतं. परिणामी दुषीत पाण्यामुळे साथीच्या रोगात वाढ झाली. रंकाळ्याचं पाणी चांगल पण ते पूर्ण क्षमतेने शहरात आणला आलं नाही. पुण्यातील बाबुराव केशव ठाकूर या व्यापा-याची अंबाबाईवर खूप श्रध्दा होती. त्यांनी शहरातील पाण्याची समस्या जाणून कात्यायनीतील स्वच्छ पाणी शहरात नळावाटे आणण्याची एक योजना आखली. त्यांनी त्या काळी स्वतःचे तीन लाख रुपये खर्च करुन कात्यायनीहून नैसर्गिक उताराच्या आधारे दगडी पाटातून पाणी नंगीवली दर्ग्यापर्यंत आणले त्यांनी २ लाख ९४ हजार ५०० गॅलन पाणी साठी करणारी टाकी नंगीवली दर्ग्याजवळ सन १८७७ साली बांधून पूर्ण केली त्यालाच ‘पाण्याचा खजिना’ म्हणतात.
*कसं जायचं- मुख्य बसस्थानक - बिंदू चौक - मंगळवार पेठ - नंगीवली चौक - पाण्याचा खजिना टाकी. (४ किमी)राजेशाही थाटाचा दसरा चौक (मैदान)
दसरा चौक परिसरास पूर्वी चौफाळ्याचा माळ म्हणत. १८८९ नंतर दस-याला शिलंगणाचं सोनं लुटण्याचा सोहळा इथे होऊ लागला आणि या माळाला दसरा चौक हे नाव मिळालं. पूर्वी या माळावरच सातारचे छत्रपति व करवीरचे छत्रपति यांच्या ऐतिहासिक भेटीचा सोहळा घडला होता. सध्याच्या दसरा सोहळ्यात सध्याचे छत्रपति व युवराज आपापल्या पारंपारिक शाही पोषाखात आपल्या खास ठेवणीतल्या जर्मन बनावटीची मेबॅक कार जी फक्त दसरा सोहळ्यातच बाहेर काढली जाते. त्या मध्ये बसून दसरा चौकात येतात. छत्रपतिंच्या हस्ते सोनं लुटीच्या सोहळ्यास प्रारंभ होतो.
*कसं जायचं- मुख्य बसस्थानक - दसरा चौक (२ किमी)शहराबाहेरील ऐतिहासिक स्थळे ...
काळ्या घडीव दगडातील महापालिका इमारत
कोल्हापूर शहरातील भाऊसिंग रोडवर छ. शिवाजी चौकाजवळ एक आयताकृती देखणी इमारत आपलं लक्ष वेधून घेते. ही इमारत म्हणजे महापालिका इमारत होय. ही इमारत काळ्या घडीव दगडांमध्ये बांधली असून काही ठिकाणी नक्षीकाम केल्याचे दिसून येते. ही इमारत २ मजल्यांची असून पहिल्या मजल्याव नवीन आणि जुना असे दोन दिवाणखाने आहेत.त्याचा उपयोग महापालिकेच्या बैठकीसाठी करण्यात येतो. इ.स. १९२९ ला कोल्हापूर म्युनिसीपालटीच्या इमारतीचा पूर्व, उत्तर व दक्षिण चा भाग बांधण्यात आला त्यानंतर पश्चिमेकडचा भाग तब्बल ६४ वर्षानंतर १९९३ साली बांधण्यात आला. कोल्हापूर महानगरची स्थापना १२ ऑक्टोबर १८५४ रोजी झाली. मार्च १९४१ मध्ये स्थानिक स्वराज्य संघ ही संस्था स्थापन करण्यात आली तर डिसेंबर १९७२ मध्ये नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत झाले. ऑगस्ट १९७८ मध्ये ख-या अर्थाने पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली.
*कसं जायचं- मुख्य बसस्थानक - दसरा चौक - महानगरपालिकाकोल्हापुरी पैलवानांचा दुध कट्टा
म्हैसीच्या दुधाची धार काढल्यावर जे नैसर्गिकरित्या गरम दुध असते त्यास धारोष्ण दूध म्हणतात. तर अशा धारोष्ण दूध मिळण्याच्या ठिकाणांना दुधकट्टा म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर शहरात आजही ठिकठिकाणी म्हैशीचे दूध काढून ते कोल्हापूरातील पैलवानांना व नागरिकांना प्यायला मिळते. रोज सकाळी व संध्याकाळी या ठिकाणी गर्दी असते. कोल्हापूरात महापालिकाजवळ, मिरजकर तिकटी, गंगावेश व बी.टी. कॉलेज या ठिकाणी दुध कट्ट्याची सोय आहे. तर मग कधी येताय धारोष्ण दुधाची चव चाखायला दुधकट्ट्यावर.
सोनेरी सोनतळी (रजपूतवाडी)
प्रिन्स शिवाजी या छ. शाहू महाराजांच्या धाकट्या चिरंजिवाच्या अपघाती मृत्यूनंतर छ. शाहूंनी आपले जास्तीत जास्त वास्तव्य याच ठिकाणी केले. ते इथे रजपूतवाडी कँप म्हणजेच सोनतळी इथे येऊन राहू लागले. आज या ठिकाणी रेस्ट हाऊस पहायला मिळतो. तसेच छत्रपतिंचा स्टड फार्म आहे. पूर्वी इथे छत्रपतींचे उत्तमोत्तम जातीवंत घोड्याची पैदास केली जायची. आजही इथे काही प्रमाणात जातीवंत घोडे पहायला मिळतात. सोनतळीच्या कँपचा परिसर थोड्या उंचवट्यावर असल्याने इथली सायंकाळ ही मनोहारी व सोनेरी दिसते. इथली ही सोनेरी सायंकाळ खरच अनुभवण्यासारखी आहे.
*कसं जायचं- मुख्य बसस्थानक - दसरा चौक - पंचगंगा नदी पूल - रजपूतवाडी गाव - सोनतळी कँप, ९ किमी.करवीरकर छ. संभाजीराजे मंदिर, संभापूर-
महाराणी ताराबाई यांनी करवीर येथे गादी स्थापन करुन आपले पुत्र छत्रपति शिवाजी दुसरे यांना करवीर गादीवर बसवले ते करवीर राज्येच पहिले छत्रपति होत. ते १४ वर्षे राज्यावर होते. त्यानंतर पन्हाळ्यावर राजसबाई व त्यांचे पूत्र संभाजी राजे यांनी ताराराणी व त्यांचे पुत्र छ. शिवाजी दुसरे यांना नजर कैदेत टाकले आणि करवीर गादी छ. संभाजी राजांना मिळाली. छ. संभाजी राजांना मात्र इ.स. १७१४ ते इ.स. १७६० पर्यंत ४६ वर्षे राज्य केले. इतका प्रदिर्घ काळ राज्य करण्याची संधी या पूर्वी छत्रपति घराण्यात कोणालाही मिळाली नव्हती. डिसेंबर १६६० रोजी छ. संभाजी राजांची स्वारी कसबा वडगांव येथे होती. प्रकृती अस्वस्थ झाल्याने तातडीने करवीरास जात असताना २० डिसेंबर १६६० मार्गशीर्ष शुध्द १२ मंगळवार २ प्रहरी टोप नजीकच्या माळावर देहावसान झाले. तेथेच गाव वसिवला आणि गावाचे नांव संभापूर ठेवले. आजच्या ठिकाणी थोडीसी पडझड झालेली भक्कम तटबंदी तसेच मोठी दीपमाळ सुंदर समाधी मंदिर तसेच मंदिरामध्ये छ. संभाजी राजेंचा दानपट्टा पहायला मिळतो.
* कसं जायचं - कोल्हापूर - सांगली फाटा - कुंथुगिरी (२६ किमी)शूर पराक्रमी - सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक
छ. शिवराय व छ. संभाजराजेंच्या मृत्यूनंतर मोघल औरंगजेब स्वराज्यावर आपल्या प्रचंड फौजेनिशी आला या काळात मोघल सैन्यामध्ये धडकी भरविणारी सुप्रसिध्द जोडी म्हणजे संताजी-धनाजी होय. या जोडीपैकी धनाजी म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधव होय. छ. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत धनाजीरावांना १६९६ साली स्वराज्याचे सेनापतीपद बहाल करण्यात आले. महाराणी ताराबाईंच्या काळात धनाजीरावांनी मोंघलांशी गनिमी काव्याने लढून जुल्फिकारखान, इस्माईल खान यासारख्या नामांकित मोघल सेनानींचा सपाटून पराभव केला. गुजरातेपासून तंजावरपर्यंत त्यांनी शेकडो लढाया करुन कोसळलेले स्वराज्य पुन्हा सावरुन धरले. छत्रपति शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे औरंगजेबासारख्या भयानक संकटापासून संरक्षण करण्याची महान कामगिरी त्यांनी केली.खानदेशच्या स्वारीहून परतत असताना वडगाव मुक्कामी त्यांचे देहावसान झाले.
*कसं जायचं- मुख्य बसस्थानक - कसबा बावडा मार्गे हायवे - पेठ वडगांव (१२ किमी.)प्रतिशिवाजी - सरसेनापती संताजी घोरपडे समाधी -
सरसेनापती संताजी घोरपडे यांचे नाव घेतल्याशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. इतके ते वीर पराक्रमी योद्धे होते. ज्यांच्या हातात जोपर्यंत तलवार आहे. तोपर्यंत त्यांना हरवणे मुश्कील त्यांची अशी ख्याती होती ते संताजी घोरपडे. ८०,००० सैन्याचा वेढा असतानासुध्दा औरंगजेबाच्या छावनीवरचे कळस कापून आणणारा हा योध्दा होता. शिवरायांच्या तालमीत तयार झालेला हा मल्ल गनिमी काव्यात अतिशय तरबेज होता. छ. संभाजी राजेंच्या मृत्युनंतर स्वराज्यावर खुप मोठे संकट आले पण संताजी व धनाजी या जोडगोळीने औरंगजेबाच्या सैन्याला सळो की पळो करुन सोडले.
*कसं जायचं - कोल्हापूर शहर - सांगली फाटा - अतिग्रे- कोल्हापूर सांगली रोड - नरसोबावाडी - कुरुंदवाड नदीघाट (५२ किमी)वेढात मराठे वीर दौडले सात - सरसेनापती प्रतापराव गुजर
प्रतापराव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होते. छ. शिवरायांकडून त्यांना प्रतापराव ही पदवी मिळाली होती. त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे पूढे ते स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनोबत झाले. बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोल खानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनिमी काव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळप्रसंग पाहून बहलोल खान शरण आला. युध्दात शरण आलेल्यांना मारु नये असा प्रतापरावांचा शिपाई धर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याना धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
*कसं जायचं- मुख्य बसस्थानक - निपाणी-गडहिंग्लज-नेसरी-स्मारक (८७ किमी)नरवीर शिवा काशिद समाधी
छ. शिवरांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले त्यापैकीच एक म्हणजे सिद्दी जौहरचा पन्हाळ्याला दिलेला वेढा होय. छ. शिवराय पन्हाळ्यावर असताना सिद्दी जौहरने प्रचंड फौजेनिशी पन्हाळ्याला वेढा दिला. वेढा इतका जबरदस्त होता की कोणीही आत बाहेर जाऊ शकत नव्हते. मुसळधार पावसाळ्यात सुध्दा वेढ्यात ढिल नव्हती. महाराजांना गडावर येऊन आता चार महिने होऊन गेले होते गडावरील अन्नधान्य व वैरण संपत आले होते या परिस्थितीत महाराजांनी वेढ्यातून निसटण्याची योजना आखली.
*कसं जायचं - कोल्हापूर शहर – बुधवार पेठ - समाधी (२० किमी)अष्टपैलू मुत्सद्दी राजनितीज्ञ, हुकुमतपन्हा रामचंद्गपंत आमात्य (समाधी)
शिवकाळात अंगच्या हुषारीने व पराक्रमाने जी घराणी पुढे आली आणि नावलौकीकास चढली त्यात पंच आमात्य बावडेकर हे घराणे मुख्य होते. या घराण्यातील रामचंद्गपंच आमात्यांनी तर आपल्या मुत्सदेगिरीने हा लौकिक उत्कर्ष बिंदूस पोहचवला. छत्रपति शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, महाराणी ताराबाई पुत्र छ. शिवाजीराजे दुसरे व राजसबाईपुत्र, छ. संभाजीराजे (कोल्हापूर) अशा पाच छत्रपतींची सेवा करण्याचा असामान्य बहुमान रामचंद्गपंत आमात्यांना मिळाला होता. छ. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील स्वराज्य बचावाची कामगिरी ही पंताच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कामगिरी होय. महाराणी ताराबाईंनी पंतांच्या कार्याच्या कार्याचा गौरव करताना 'मोडिले राज्य सुरक्षित ठेविले' या चारच शब्दात त्यांच्या कार्याचे यथोचित वर्णन केले आहे. महाराणी ताराबाई आणि त्यांच्यानंतर छ. संभाजी महाराज दूसरे यांच्याही दरबारात ते वडीलधारी मुत्सद्दी व सल्लागार म्हणून वावरले. फेब्रुवारी १७१६ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी आज्ञापत्र नावाच्या मराठेशाहीतील राजनितीवर, विशेषतः छ. शिवरायांच्या राजनितीवर चिकित्सात्मक ग्रंथ रचला.
*कसं जायचं - कोल्हापूर शहर - पन्हाळा किल्ला - रेडेमहाल (डेरेमहाल) – समाधी (२२km)